लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: आरोग्य दूत, सामाजिक कार्यकर्ता तसेच भाजपशी संबंधित कार्यकर्ता अशी वेगवेगळी ओळख असलेला तुषार जगताप हा राज्यस्तरावर चालविण्यात येणाऱ्या गुटखा बाजारपेठेचा माफिया निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जगताप हा सध्या नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे.

इगतपुरी पोलीस पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दोन कंटेनरमधून सुमारे सव्वा कोटीचा गुटखा जप्त केला. या संदर्भात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी राज भाटिया (३८, रा. जयपूर) याला जयपूर येथून ताब्यात घेतले. राज याची चौकशी केली असता दिल्ली आणि जयपूर येथून सुत्रे हलवित बंद कंटेनरमधून गुटख्याची देशातील विविध राज्यांमध्ये तस्करी होत असल्याची कबुली त्याने दिली.

हेही वाचा… नाशिक : सावाना अभ्यासिकेत प्रवेशासाठी आता ई व्यवस्था, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न

तसेच यामध्ये नाशिकमधील तुषार जगताप २०२१ पासून संपर्कात असून त्याच्या मदतीने गुटख्याची तस्करी करण्यात येत असल्याचे सांगितले. तुषार हा परराज्यातील साथीदारांसह गुटखा तस्करीच्या जाळ्याचा भाग होता. तो नाशिक जिल्ह्यात गुटख्याची तस्करी करीत होता. तुषार याच्या अटकेमुळे राज्यातील गुटखा तस्करीची पाळेमुळे सापडण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी व्यक्त केला.

आरोग्य दूत ते गुटखा किंग

गुटखा किंग असलेला तुषार जगताप राजकीय मंडळींसमवेत वावरत असे. तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस दलातील अन्य अधिकाऱ्यांसोबत त्याची जवळीक होती. तत्कालीन पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय म्हणूनही तो काम पाहत होता. नाशिक येथे झालेल्या महाआरोग्य शिबीरावेळीही त्याने महत्वपूर्ण जबाबदारी पेलली होती.

हेही वाचा… कॉलेज रोड, गंगापूर रस्त्यावर एकेरी वाहतुकीची गरज; कोंडी फोडण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नियोजन आवश्यक; राष्ट्रवादीचे पोलिसांना साकडे

करोना काळात रुग्णांना खाटा, औषध, प्राणवायूसाठा उपलब्ध करून देत असल्याचा आभास त्याने निर्माण केला होता. यामुळे आरोग्य दूत म्हणून तो ओळखला जाऊ लागला होता. २०१९ मध्ये मराठा आर्थिक विकास महामंडळाचा संचालक म्हणूनही त्याने काम पाहिले. मराठा क्रांती मोर्चा नियोजनातही तुषारची भूमिका होती.

राज भाटिया सराईत गुन्हेगार

राज भाटिया हा दिल्ली आणि जयपूर येथून गुटख्याची तस्करी करीत होता. तो सराईत गुन्हेगार असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्या विरूध्द गुन्हे आहेत. इगतपुरी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tushar jagtap who is known as social worker is involved in gutkha smuggling dvr
Show comments