पालकांनी शिक्षकांबरोबर अतिशय जागरूकपणे मुलांचे संगोपन करणे गरजेचे आहे. टीव्ही व मोबाइलमुळे मुलांवर दृश्य परिणाम होत आहेत. मुले आई-वडिलांचे अनुकरण करत असल्यामुळे पालकांनी घरात व्यवस्थित वागले पाहिजे, असे प्रतिपादन संजय पंचारिया यांनी केले.
नाशिकरोड येथील श्री संकल्प केमिस्ट ग्रुपतर्फे पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेचे उद्घाटन नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संकल्प केमिस्ट ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र शहा होते. पंचारिया यांनी मुलांचे संगोपन योग्य होण्यासाठी मुलांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले. मुलांना टीव्ही पाहणे, मोबाइलचा वापर कमी करून शारीरिक खेळाकडे वळवावे. अभ्यासासाठी पद्धत, आवड ओळखून त्यानुसार त्याच्याकडून अभ्यास करून घ्यावा. मुले आई-वडिलांचे ऐकत नाहीत तर त्यांचे अनुकरण करतात, त्यामुळे तंत्रज्ञान युगात मुलांचे संगोपन करताना आपण कसे वागावे, काय बोलावे, काय बोलू नये हे मुलांना समजून सांगावे, अशी सूचनाही पंचारिया यांनी केली. संगीता गायकवाड यांनी पालकांकडून कळत-नकळत चुका होत असतात. त्या कशा दुरुस्त कराव्यात हे कळावे यासाठी कार्यशाळा माध्यम चांगले असून असे उपक्रम नेहमी होण्याची गरज असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन शिवाजी हांडोरे यांनी केले. संयोजन संजय बागूल, अरुण माळवे, अमित कवडे, विनायक पावगी, चेतन सोनकांबळे आदींनी केले.

Story img Loader