नाशिक : बस प्रवासात महिलेच्या पिशवीतील १२ लाखाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. नाशिक-मुंबई दरम्यानच्या बस प्रवासात ही घटना घडली. याबाबत शेवंती माहब्दी (दहिसर, मुंबई) यांनी तक्रार दिली. माहब्दी देवदर्शनानिमित्त शहरात आल्या होत्या. नऊ मार्च रोजी सकाळी त्या वणी येथील देवदर्शन आटोपून नाशिक येथील महामार्ग स्थानकातून मुंबईकडे रवाना झाल्या. बस प्रवासात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील दागिने असलेला स्टीलचा डबा चोरला. या डब्यात सुमारे १२ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. या प्रकरणी मंंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलास बेदम मारहाण
खेळताना मुलांमध्ये झालेल्या वादातून १४ वर्षाच्या मुलास एका कुटूंबातील सदस्यांनी बेदम मारहाण केली. जुना आडगाव नाका भागात ही घटना घडली. याबाबत सुनील पवार (नागचौक, पंचवटी) यांनी तक्रार दिली. रवी वळे, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलाचे दोन मित्र अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पवार यांचा अल्पवयीन मुलगा रोनित हा १८ मार्च रोजी सायंकाळी मित्रासमवेत कृष्णनगर येथील उद्यानात खेळण्यासाठी गेला होता. या ठिकाणी वळे यांच्या मुलाशी खेळताना वाद झाला. याची माहिती मिळताच वळे कुटूंबियांनी धाव घेत रोनित याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या भागात दोघांची आत्महत्या
नाशिकरोड भागात राहणाऱ्या दोघांनी मंगळवारी गळफास घेतला. यामध्ये एका ४४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. गोरेवाडीत राहणाऱ्या मेहरीन शेख (हुसेनबाग, जुना ओढा रोड) यांनी मंगळवारी वासुदेव नंदन अपार्टमेंटमधील घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. याबाबत शरीफ इनामदार यांनी माहिती दिली. दुसरी घटना शिंदे गावात घडली. वसंत इंगळे (५२, गौतमनगर, नायगाव रोड, शिंदे) यांनी राहत्या घरात दोरी बांधून गळफास घेतला. याबाबत घरमालक संपत गोवर्धने यांनी माहिती दिली. दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
शस्त्र बाळगणारे तिघे ताब्यात
पाथर्डी फाटा परिसरात धारदार शस्त्र बाळगणाऱ्या त्रिकूटाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या बाबत अंमलदार संतोष कोरडे यांनी तक्रार दिली. अंबादास कापसे (१९, घरकुल योजना, चुंचाळे शिवार), पियूश वाघ (१८, चंद्रलोक हॉटेलजवळ, राणेनगर) आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पांडुरंग चौकातील आनंद गार्डन भागात तिघांकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे मंगळवारी सायंकाळी पथकाने धाव घेतली. संशयितांकडे दोन धारदार कोयते, एक चाकू आढळला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.