धुळे शहरासह बाहेरच्या जिल्ह्यात बनावट चावीच्या सहाय्याने चारचाकी वाहने चोरणार्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगावरोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांची चाळीसगाव चौफुलीजवळून आणि बुलढाण्याहून चोरी केलेली दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत.शहरातील चाळीसगावरोड चौफुलीवरुन एक मालवाहू वाहन चोरीला गेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एका चोरट्याने चोरीची वाहने लपवून ठेवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेंमत पाटील यांना मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानुसार निरीक्षक पाटील आणि चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांच्या संयुक्त पथकाने चोरट्यांचा शोध घेतला. त्यात अरबाज शेख साजीद मनियार (२५), शाहरुख अब्बास खाटीक (२६, दोघे रा.जामचा मळा, चाळीसगावरोड, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने दोन्ही चारचाकी वाहने चोरी केल्याची आणि यातील चोरीचे क्रुझर वाहन संत नरहरी कॉलनीत तर मालवाहू वाहन ज्योती चित्रमंदिराजवळ लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested for stealing four wheelers dhule amy