जळगाव : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी उत्तर महाराष्ट्रात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या. एक प्रकार जळगाव जिल्ह्यात तर दुसरा नाशिक जिल्ह्यात घडला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सर्वत्र शासकीय यंत्रणा गुंतलेली असताना रविवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यावेळी अमळनेर तालुक्यातील एकतास या गावातील रहिवासी गोकुळ बच्छाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. बच्छाव यांचे गावातील एका व्यक्तीशी शेतीच्या वहिवाटीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. त्याच वादातून काही दिवसांपासून बच्छाव यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना समोरच्या गटाने मारहाण केली होती. बच्छाव यांच्या तक्रारीवरून ३५ जणांविरोधात दंगलीसह मारहाण, चिथावणी देणे, जखमी करणे अशी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांचे आणि संशयितांचे साटेलोटे असल्याने आपल्याला न्याय मिळत नसल्याची भावना बच्छाव यांनी रविवारी जळगावमध्ये व्यक्त केली. आपल्या मागणीची दखल घेतली जावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना त्यापासून रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यापूर्वीही बच्छाव यांनी एकदा असाच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून बच्छाव यांच्या विरोधात जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा दुसरा प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला.

नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्याच्या ताहाराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर वन मजूर राजेंद्र साळुंखे (रा. श्रीपूरवडे, ता.बागलाण, नाशिक) यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेतले. ते सुमारे ६० टक्के भाजले गेले आहेत. साळुंखे यांनी याआधीच वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, त्यांच्या या इशाऱ्याकडे वन विभाग आणि पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साळुंखे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समजताच श्रीपुरवडे येथील संतप्त नागरिकांनी ताहाराबाद वनपरिक्षेत्र कार्यालय गाठले. साळुंखे यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. याप्रकरणी एका वनपालावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वनपालाशी असलेल्या वादामुळे साळुंखे यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two attempted self immolations occurred in jalgaon and nashik districts on republic day january 26 sud 02