नाशिक : शहरातील खासगी सावकार वैभव देवरेपाठोपाठ व्याजाने पैसे देत भरमसाठ वसुली करणारा भाजपचा माजी पदाधिकारी रोहित कुंडलवालसह चार जणांचे पाय अधिकच खोलात गेले आहेत. त्यांच्याविरूध्द तक्रारींची संख्या वाढत आहे. खासगी सावकार कुंडलवाल पिता-पुत्राविरुध्द दोन कर्जदारांच्या जमिनीची कागदपत्रे बळजबरीने ताब्यात घेत अवाजवी व्याज वसूल करूनही त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारदाराने पाच मार्च १९९९ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत खासगी सावकार कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल आणि निखिल कुंडलवाल (तिघेही रा. पंचवटी) यांच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. कुंडलवाल पिता-पुत्रांनी तक्रारदाराकडे अवाजवी व्याजाची मागणी करून व्याजाच्या हप्त्याची तारीख चुकली म्हणून दंडापोटी म्हणून एकूण ८० लाख रुपये घेतले.
मुद्दल, व्याज, दंड आणि व्याजाची आणखी ५० लाख रुपयांची मागणी कुंडलवाल यांनी केली. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर माहेरी खरेदी केलेल्या जमिनीचे जबरदस्तीने खासगी सावकार कुंडलवाल याने त्याच्या आईच्या नावे मुखत्यारपत्र करून घेऊन जमीन त्याच्या सासूच्या नावे करून घेतली. एवढेच नव्हे, तर कैलासने तक्रारदाराच्या मुलासह मुलीचे अपहरण करून मुलीच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची भुत्याणे (ता. चांदवड) येथील जमीनही जबरदस्तीने नावावर करून घेतली. जोपर्यंत आमचे ५० लाख रुपये देत नाहीत, तोपर्यंत जमीन परत करणार नाही. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर पोलीस ठाण्यातही गुन्हा
खंडणीचा दुसरा प्रकार कृषीनगर येथे घडला. तक्रारदाराने संशयित कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल, निखिल कुंडलवाल (तिघेही रा. उदय कॉलनी, पंचवटी) आणि दया कुमावत यांच्याकडून ४९ लाख ३६ हजार रुपये व्याजाने घेतले होते. कुंडलवाल पितापुत्रांनी तक्रारदाराकडे अवाजवी व्याजाची मागणी करून व्याजापोटी व व्याजाच्या हप्त्याची तारीख चुकली म्हणून दंडापोटी असे एकूण ५२ लाख रुपये घेऊनही मुद्दल, व्याज व दंड धरून आणखी ६४ लाख ३६ हजार रुपयांची मागणी केली.
रोहित कुंडलवालने तक्रारदाराच्या घरी जाऊन धमकी देत तक्रारदाराच्या पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर निखिलने तक्रारदाराचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. कैलास आणि निखिल यांनी तक्रारदाराच्या हातातील सोन्याच्या तीन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कुंडलवाल पिता-पुत्र आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.