लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: जिल्ह्यातील काही भागात बालमजुरी समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याने बालमजुरीच्या विळख्यात अडकलेल्या बालकांच्या सुटकेसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. बागलाण तालुक्यात दोन बालमजुरांची पोलिसांनी सुटका केली असून दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजात असणाऱ्या गरिबीचा फायदा घेत अल्पवयीन मुलांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात गुंतविण्याचे प्रकार सध्या उघडकीस येत आहेत. बऱ्याच ठिकाणी बालकेही घरातील आर्थिक परिस्थिती पाहता अर्थार्जन करुन कुटूंबाला हातभार लावत आहेत. यामुळे बालमजुरीचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. हा विळखा सुटावा यासाठी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक गठित केले आहे.

हेही वाचा… धुळ्यात करोना केंद्रासाठी युवा सेनेचे आंदोलन

पथकाने जिल्ह्याच्या आदिवासी भागात तसेच अतिदुर्गम वाड्या, वस्त्या तसेच गावांना भेटी देत स्थानिक पोलीस पाटील, आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांची मदत घेत बालमजुरीविषयी प्रबोधन करण्यास सुरूवात केली. वेठबिगारीविषयी सातत्याने माहिती देण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान महाराष्ट्र दिनी पथकाला बागलाण तालुक्यात कामावर असलेल्या दोन बालमजुरांविषयी माहिती मिळाली. ठेंगोडा शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारानजीक एका शेतात शेळ्या, मेंढ्या चारण्याचे काम करणाऱ्या दोन बालकांची चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या प्रतिनिधींच्या मदतीने सुटका केली.

हेही वाचा… जळगाव जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूंची अदलाबदल; डीएनए चाचणीव्दारे आता पालक निश्चिती

या ठिकाणी संशयित संभाजी पाकळे, नंदलाल पाकळे यांच्याविरुध्द बालकामगार अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी कमी वेतन देत बालकांची आर्थिक, मानसिक, शारीरिक पिळवणूक केली. हे पथक जिल्ह्यात सातत्याने वेठबिगारी आणि बालकामगार जनजागृतीसाठी काम करत आहे. या अंतर्गत बालमजूर आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा उमाप यांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two child labour have been rescued by the police in baglan taluka and a case has been registered against two suspects in nashik dvr