नाशिक – कौटुंबिक वाद आणि दारुचे व्यसन यातून पित्यानेच आपल्या दोन लहान मुलांना तापी नदीपात्रात फेकून त्यांची हत्या केल्याचा प्रकार धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील कोळी (३६,थाळनेर ता.शिरपूर) आणि छायाबाई (२९) या दाम्पत्यास कार्तिक (पाच) आणि चेतना (तीन) अशी दोन मुले होती.
सुनील यास दारुचे व्यसन असल्याने तो नेहमी पत्नीकडे पैशांची मागणी करत असे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. मंगळवारी छायाबाईने सुनील यास दारु पिण्यास पैसे न दिल्याने त्यांच्यात भांडण झाले. या रागातून सुनीलने मुलगा कार्तिक आणि मुलगी चेतना या दोघांना तापी नदीपात्रात फेकून दिले. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळी गावकर्यांना मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसले. पोहणार्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सुनील कोळी यास ताब्यात घेतले असून छायाबाई हिच्या तक्रारीवरुन सुनीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.