लोकसत्ता वार्ताहर
धुळे : जिल्ह्यातील लोणखेडी येथे झोपडीला अचानक लागलेल्या आगीत चिमुकल्या भाऊ- बहिणीचा होरपळून मृत्यू झाला. रेणू (चार वर्षे) आणि अमोल (सात वर्षे ) नाना पवार अशी दोघांची नावे आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नाना पवार हे त्यांच्या दोन्ही मुलांना लोणखेडी येथे आजीकडे सोडून पत्नीसह ऊस तोडणीसाठी बारामती येथे गेले होते. त्यांचा मुलगा अमोल हा लोणखेडी येथे पहिलीच्या वर्गात तर रेणू अंगणवाडीत शिक्षण घेत होती. रविवारी दुपारी आजी गुरांना पाणी पाजण्यासाठी गेली असताना झोपडीतून धूर येऊ लागला. झोपडी काही मिनिटातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यावेळी रेणू आणि अमोल झोपडीतच होते. झोपडी लोणखेडी गावापासून साधारणपणे एक किलोमीटरवर असल्याने लगेच मदत मिळू शकली नाही.
आणखी वाचा-नाशिकमध्ये संभाजी चौकात पाणी पुरवठा विस्कळीत
मोलमजुरी करून आजी उदरनिर्वाह करत होती. टेकडीवरील झोपडी पेटल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यत उशीर झाला होता. रेणू आणि अमोल यांचा होरपळून मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह ग्रामस्थांनी धुळे येथील रुग्णालयात आणले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत बालकांचे आई, वडील लोणखेडी येथे पोहचले. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकलेले नाही. धुळे तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.