लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : गणेश विसर्जनादरम्यान शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात तीन युवक बुडाले. पाथर्डी गावालगत वालदेवी नदीत दोघांचा मृत्यू झाला. तर बेळगाव ढगा शिवारात दगडाच्या खाणीत १९ वर्षीय युवक बुडाला.

यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे बहुतांश धरणे व तलाव तुडुंब भरलेले आहेत. नद्याही प्रवाही असल्याने विसर्जनावेळी खबरदारी घेण्याचे आवाहन यंत्रणेकडून सातत्याने करण्यात आले होते. पाथर्डी गावाच्या पुढील भागात वालदेवी नदी वाहते. या ठिकाणी स्वयंम मोरे (२४) व ओमकार गाडे (२३, रा. साई अव्हेन्यू, म्हाडा कॉलनीजवळ, पाथर्डी गाव रस्ता) हे युवक गणेश विसर्जनासाठी गेले होते. यावेळी खोलीचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. आसपासच्या नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलास कळवली. दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरू केले. परंतु, रात्री अंधार पडल्याने हे काम थांबवावे लागले.

आणखी वाचा-Nanagaon : नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण आणि भुजबळांशी वैर, यावेळी कांदे गड राखणार?

दरम्यानच्या काळात या दोन्ही युवकांचे मृतदेह पुढील भागात आढळल्याचे दलाकडून सांगण्यात आले. बेलगाव ढगा शिवारात दगडाच्या खाणीत मनोज पवार (१९, स्वामीनगर डीजीनगर -दोन ) हा युवक बुडाला. मनोज हा गणपती विसर्जनासाठी या भागात आला होता. यावेळी तो पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

Story img Loader