नाशिक शहरातील रखडलेले विविध प्रश्न, विकास कामे आणि अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने भाजप नेत्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. वेगवेगळ्या मुद्यांवर पदाधिकाऱ्यांमधील मतभिन्नता उघड झाली. शहराच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल, असे भाजपच्या काही नेत्यांनी म्हटले आहे. तर काहींनी प्रशासकीय राजवटीत कामे रखडल्याची तक्रार करीत नागरिकांच्या प्रश्नांवर उत्तरे न मिळाल्यास जबाब दो आंदोलनाचा इशारा दिला.
हेही वाचा- नाशिक : सौर ऊर्जा कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या
शहरातील विविध प्रश्नांविषयी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह १९ माजी नगरसेवकांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली. दोन तास विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व विषयांवर अतिशय साधकबाधक सकारात्मक चर्चा होऊन वस्तुस्थिती मांडण्यात आली. चर्चेतून भाजपच्या शिष्टमंडळाचे समाधान झाल्याचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी म्हटले आहे. मनपा शाळेतील शिक्षकांचा आढावा घेऊन फेरनियोजनाची तयारी प्रशासनाने दर्शविली. दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष पालवे यांनी अर्थसंकल्प आणि शहरातील विकास कामांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असून पुढील काळात शहराचा निश्चितपणे विकास होईल, अशी भावना व्यक्त केली. मनपाला शासनाकडून काही मदत लागल्यास त्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत दिलेल्या निवेदनातून प्रशासकीय राजवटीतील कार्यपध्दतीविषयी भाजपमध्ये दोन गट पडल्याचे उघड झाले.
हेही वाचा- नाशिक : मुलींचा जन्मदर वाढीसाठी गर्भवतींचे सर्वेक्षण; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठकीत सूचना
चर्चेत प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याची नाराजी पाटील यांनी व्यक्त केली. भाजपच्या कार्यकाळात मांडलेले अनेक प्रकल्प पुढे सरकले नाही. मनपाने आयटी पार्कसाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया न केल्यामुळे आता एमआयडीसीकडून आयटी पार्क केला जात आहे. लॉजिस्टीक पार्कची तीच स्थिती आहे. मनपाने प्रस्ताव शासनाला दिला नाही. नमामि गोदा प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया वर्षभर रखडली होती. टीका होण्याच्या भीतीने घाईत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. गावठाणात चार चटईक्षेत्र (एफएसआय) देण्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही. झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याच्या दृष्टीकोनातून पावले टाकली गेली नाहीत. महानगरपालिकेची नेमकी आर्थिक स्थिती काय, कराच्या माध्यमातून फेब्रुवारी अखेरपर्यंत मिळालेले उत्पन्न आणि सध्याचे दायित्व यांची माहिती मागण्यात आली. मनपाच्या इतिहासात प्रथमच अंदाजपत्रक मार्चमध्ये सादर करण्याची वेळ आली आहे. अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याची उत्तरे न मिळाल्यास जबाब दो आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला. या निवेदनावर भाजप नेत्यांसह माजी नगरसेवकांची स्वाक्षरी असली तरी प्रशासकीय राजवटीबद्दल नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे अधोरेखीत झाले.
पेठ रस्ता कामात कालापव्यय
महाराष्ट्र-गुुजरात दरम्यानच्या वाहतुकीतील अतिशय महत्वाच्या पेठ रस्त्याला शहरात मोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. महापालिकेने तातडीने डांबरी रस्ता करणे अपेक्षित होते. काँक्रिटीकरणाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.