नाशिक : देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी स्फोट होऊन दोन अग्निविरांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
तोफखाना दलाचे देशातील प्रमुख प्रशिक्षण केंद्र देवळाली कॅम्प येथे आहे. या ठिकाणी दलात दाखल होणाऱ्या अग्निविरांसह जवानांना तोफखाना केंद्रात तर अधिकाऱ्यांना तोफखाना स्कूलमध्ये विविध अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे गुरुवारी दुपारी तोफखान्याचा सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली. इंडियन फिल्ड गन या तोफेतून अग्निवीर तोफगोळे डागत होते. त्यावेळी एका गोळ्याचा जागीच स्फोट होऊन गोहिल विश्वराज सिंग (२०) आणि सैफत शित (२१) हे दोन अग्निवीर गंभीर जखमी झाले. धातूचे तुकडे त्यांच्या शरीरात शिरले होते. हे लक्षात येताच नाईक सचिन चव्हाण, नायब सुभेदार सुदेश मामेन, नायब सुभेदार सुंदरराज यांनी तातडीने त्यांना देवळाली कॅम्प येथील लष्करी रुग्णालयात नेले. परंतु, दोन्ही अग्निविरांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. अग्निविरांच्या मृत्युमुळे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल धिरज सेठ यांनी दु:ख व्यक्त केले. तोफखाना सरावावेळी घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा…परतीच्या पावसाचा वीज पुरवठ्याला फटका, गंगापूर रस्त्यावरील काही भाग २४ तास अंधारात
याआधीही दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
काही वर्षापूर्वी काही दिवसांच्या अंतराने अशा दोन दुर्घटना देवळाली कॅम्प येथे घडल्या आहेत. तेव्हाही तोफेतून डागलेला गोळा बॅलरच्या अगदी समीप फुटला. त्यामुळे कर्नल कमलेश्वरमणी त्रिपाठी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हाही अधिकारी इंडियन फिल्ड गन तोफेवर सराव करीत होते. या घटनेनंतर दोन दिवसांनी स्वीडन बनावटीच्या एल – ७० विमानभेदी तोफेच्या प्रशिक्षणादरम्यान सुभेदार सुकंताप्रसाद यांचा मृत्यू झाला होता.