जळगाव: जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर गलितगात्र अवस्था झालेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसणार आहे.  शरद पवार यांचे निष्ठावान मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांचा अजित पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यांच्याबरोबर आणखी काही माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारीही पुढील महिन्यात हाताला घड्याळ बांधणार आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार गुलाबराव पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लगेचच अजित पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी जोरदार विरोध केल्याने पक्षश्रेष्ठी अनुकूल असतानाही त्यांचा पक्ष प्रवेश बारगळला होता. यथावकाश, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला. त्यामुळे देवकर यांच्या वाटेतील अडथळे आपोआप दूर झाले असून, पुढील महिन्यात मुहुर्त पाहून पक्षाध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

दरम्यान, देवकर यांच्याबरोबर आणखी मोठे चेहरे शरद पवार गटाचा राजीनामा देऊन अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने ते चेहरे नेमके कोण आहेत, त्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोणी कुठेही गेले तरी मी शरद पवार यांची साथ सोडून कुठेच जाणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा डॉ. सतीश पाटील यांनी पक्षाच्या मेळाव्यात जळगावमध्ये काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, देवकर यांच्या पाठोपाठ ते देखील आता शरद पवार यांची साथ सोडून आता अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीला लागले आहेत. पत्रकारांना त्यांनी स्वतः त्यासंदर्भात दुजोरा दिला आहे. मुंबईत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील आठवड्यात राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. गुलाबराव देवकर आणि डॉ.सतीश पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढण्यास मोठी मदत होऊ शकेल. त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला निश्चितपणे होईल. परंतु, शरद पवार गटाचे उरलेसुरले अवसान दोन्ही माजी मंत्र्यांच्या पक्ष सोडून जाण्याने गळून पडेल