प्रत्येकी १० ते १५ लाखांची रक्कम घेत शासकीय नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन तालुका परिसरातील ११५ बेरोजगारांना तब्बल १७ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी संलग्न खात्याची ही नियुक्तीपत्रे असल्याचे भासवले गेल्याने बेरोजगार तरुण नोकरीच्या या आमिषाला बळी पडले.
काही दिवसांपूर्वी येथील न्यायालयासमोरील एका इमारतीत तसेच वर्धमाननगर या उच्चभ्रू वसाहतीत ‘पी.डब्लू.डी.वेब मॅनेजमेंट डिपार्टमेंट’ नावाचे कार्यालय थाटण्यात आले होते. या कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी भरती करताना बेरोजगारांकडून लाखो रुपये घेण्यात आले. या कथित कार्यालयांमध्ये भरती झालेल्या तरुणांना प्रारंभी काही काळ बँकेच्या माध्यमातून दरमहा नियमितपणे वेतन दिले गेले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाशी या कार्यालयांचे नामसाधम्र्य असल्याने हा सरकारी उपक्रम असावा, अशी अनेक बेरोजगारांची भावना झाली. या कार्यालयांमध्ये प्रमुखाच्या भूमिकेत वावरणारा भूषण शेवाळे याने काही दिवसांपूर्वी खा. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून मुंबईत मंत्र्यांना भेटून नोकरीच्या आमिषाने मालेगाव व शेजारच्या तालुक्यांमधील १०० पेक्षा अधिक बेरोजगारांची फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. खासदारांनी लक्ष घातल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीमुळे काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आले होते. फसवणूक झालेल्या प्रवीण सूर्यवंशी या तरुणाने बुधवारी रात्री तक्रार दिल्यावर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुंबईत तक्रार करणारा शेवाळे हाच या प्रकरणात म्होरक्या असल्याचे त्यातून अधोरेखित होत आहे. भूषण व त्याचा साथीदार ललित शेवाळे या दोघांचे संगनमत असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा