नाशिक : नांदगाव तालुक्यातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला सायबर गुन्हेगारांनी पोलीस अधिकारी आणि बँक अधिकारी असल्याचे ध्वनिचित्रफितीतून भासवून २४ लाख १० हजार रुपयांना फसविले.बापू बोरसे (६१, रा. शांतीबाग, नांदगाव), हे ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या खात्यावर निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, भविष्यनिर्वाह निधी आणि अन्य रक्कम असे जवळपास ६८ लाख रुपये जमा झाले होते. ही सर्व रक्कम बँक खात्यात होती.
२४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता बोरसे यांच्याशी एकाने भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. हिंदीत बोलणाऱ्याने पोलीस अधिकारी असल्याचा दावा करुन नरेश गोयलच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात छापा टाकला असता त्यात तुमचे एटीएम कार्ड सापडल्याचे बोरसे यांना सांगितले.
तुमच्या खात्यातील ६८ लाख रुपयांची चौकशी करायची असल्याचे सांगून त्यांनी बोरसे यांच्याकडून पासबुकची छायाचित्रे मागवली. त्यानंतर व्हाॅटसॲपवरुन व्हिडीओ संदेशात एका बनावट पोलीस अधिकाऱ्याने कुलाबा पोलीस ठाण्याच्या पार्श्वभूमीवर धमकी दिली. तुम्ही सहकार्य न केल्यास अटक होईल, तुमच्या कुटुंबालाही त्रास होईल, असा दम दिला. एक रिझर्व्ह बँकेची बनावट नोटीस आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला. तुमच्या पैशाची चौकशी करायची आहे.
राष्ट्रीय गुपित असल्याने कोणाला सांगू नका, अन्यथा कुटुंबियांना त्रास होईल. तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी धमकी बोरसे यांना देण्यात आली. चौकशीनंतर तुमचे पैसे २४ तासांत परत देण्यात येतील, असेही सांगण्यात आले. या धमकी आणि दबावाला घाबरून बोरसे यांनी संबधिताने सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे तब्बल २४ लाख १० हजार रुपये पाठविले. त्यानंतर दोन दिवस भीतीमुळे ही माहिती त्यांनी कोणालाच दिली नाही. परंतु, पैसे परत न आल्याने बोरसे व त्यांचा मुलगा हर्षद यांनी सायबर पोलीस विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानंतर नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला
नांदगाव पोलिसांनी या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने तपास सुरू केला असून फसवणूक झालेल्या खात्यांची माहिती गोळा केली जात आहे. संबंधित मोबाईल क्रमांकांचा तपशील मिळवून संशयितांचा शोध घेण्यात येईल. कोणतीही बँक अथवा सरकारी संस्था फोन, व्हाटसॲपवरून गोपनीय माहिती अथवा पैसे मागत नाही. अशी माहिती कोणी मागत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा फसवणुकींपासून जनतेने सतर्क राहावेप्रीतम चौधरी (पोलीस निरीक्षक, नांदगाव)