सायकलवरून गस्त, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांशी संवाद, तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक.. असे उपक्रम राबवत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू असली तरी गुन्हेगारी घटनांवर काही केल्या नियंत्रण येत नसल्याचे चित्र आहे. सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यांचे सत्र सुरू असताना त्यात आणखी घरफोडीच्या दोन घटनांची भर पडली. या माध्यमातून चोरटय़ांनी सुमारे आठ लाखांचे मौल्यवान दागिने लंपास केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर आजवर मौन बाळगणाऱ्या भाजपच्या आमदारांना संपर्क कार्यालयालगत घटना घडल्यानंतर मौन सोडणे क्रमप्राप्त ठरले. नाशिक पूर्व मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. गुन्हेगारी टोळक्यांविरुद्ध कारवाई सुरू असून दहशत माजविणाऱ्या टोळक्यांची माहिती घेऊन कारवाईचे सूतोवाच पोलिसांनी केले आहे.
मागील काही महिन्यांपासून नाशिकची वाटचाल गुन्हेगारांचे शहर या दिशेने होत असल्याचे दिसते. गुन्हेगारी घटनांचा आलेख कमी होण्याऐवजी दिवसागणिक उंचावत आहे. काही दिवसांपूर्वी काटय़ा मारुती पोलीस चौकीत एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवून गुन्हेगारांनी अप्रत्यक्षपणे पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दाखविले होते. त्यानंतर पंचवटीत टवाळखोरांनी तीक्ष्ण हत्यारे घेऊन खुलेआम फिरण्याची हिंमत दाखविली. सोनसाखळी चोरी, दुचाकी व चारचाकी वाहने लंपास होणे, मारझोड करून रोकड लंपास करणे, घरफोडय़ा यावर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणा अपयशी ठरली. दरम्यानच्या काळात आपले अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी पोलिसांनी सायकलवरून गस्त, नागरिक व व्यापारी वर्ग तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद, तक्रारी नोंदविण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांकाची व्यवस्था आदी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांची अंमलबजावणी सुरू असतानाच गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरू आहे.
पंचवटीतील श्रीकृष्णनगर येथे उमिया अपार्टमेंटमधील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी २० तोळे सोने लंपास केले. दीपावलीनिमित्त नेमिचंद मुनोरा कुटुंब बाहेरगावी गेले असताना हा प्रकार घडला. आसपासच्या नागरिकांनी घर उघडे असल्याची कल्पना दिल्यावर हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चोरटय़ांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. दुसरी घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. साहिल अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून तीन लाख सात हजार रुपयांचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. विश्वनाथ घोरपडे यांच्या घरात हा प्रकार घडला.
पहिली घटना भाजपचे आ. बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयालगत घडली. मागील काही दिवसांत या भागात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी या भागात भेट देऊन स्थितीची पाहणी केली. आ. सानप यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. पोलिसांच्या काही अडचणी असल्यास त्या शासनदरबारी मांडण्याची तयारी आहे.
गुन्हेगारी टोळक्यांवर मोक्कासह कठोर कायद्यान्वये कारवाईची मागणी त्यांनी केली. या वेळी आयुक्तांनी गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट केले. शहरात दहशत पसरविणाऱ्या टोळ्यांची माहिती घेतली जात असून त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. दोन नवीन पोलीस ठाण्यांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.
दरम्यान, शहरातील तिन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधात असताना भाजपने वारंवार आंदोलने करून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होते. सद्य:स्थितीत गुन्हेगारीने डोके वर काढले असताना या पक्षाचे आमदार मौन बाळगून आहेत. आ. सानप यांना आपल्या कार्यालयासमोर चोरीची घटना घडल्यानंतर जाग आल्याचे अधोरेखित झाले.
चोरटय़ांच्या उच्छादामुळे आमदारही हैराण
सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यांचे सत्र सुरू असताना त्यात आणखी घरफोडीच्या दोन घटनांची भर पडली.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 20-11-2015 at 03:41 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two incidents of burglary in nashik