नंदुरबार- जिल्ह्यात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ किलोमीटर वेगाने आलेल्या वादळाने दोन जणांचा बळी घेतला. तळोदा तालुक्यात झाड पडून एकाचा तर, नवापूर तालुक्यात बस आणि मालमोटार यांच्यात धडक होऊन मालमोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला. नाशिक- नवापूर बसमधील १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. वादळी वाऱ्याने अनेक पशु देखील मृत्यूमुखी पडले आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानीचा अंदाज आहे.
हेही वाचा >>> नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित
जिल्ह्यात सकाळी ११ वाजेच्या सु्मारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने धुळीने समोरचे काहीच दिसेनासे झाले होते. अनेक घरांचे पत्रे उडाले. तळोदा तालुक्यातील चिनोद येथे वादळात वडाचे झाड चारचाकीवर पडून राजेंद्र मराठे (रा.प्रतापपूर, तळोदा) यांचा मृत्यू झाला. या गाडीतील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. नवापूर तालुक्यात मासलीपाड्याजवळ नाशिक-नवापूर बस आणि मालमोटार यांच्यात धडक झाली. यात मालमोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. वादळामुळे निर्माण झालेल्या धुळीमुळे समोरील वाहन न दिसल्यानेच हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. तळोदा तालुक्यातील विहीरमाळ परिसरात जंगलात चरावयास गेलेल्या ३० ते ३५ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरांची मोठी पडझड झाली आहे. शहादा तालुक्यातील केळींच्या बागांना देखील या वादळाचा फटका बसला.