नाशिक – राजगुरुनगरहून नाशिककडे येणाऱ्या राज्य परिवहनच्या बसची पुढे थांबलेल्या दुसऱ्या बसला धडक बसल्यानंतर एक बस पेटल्याने त्यात दुचाकीवरील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. एक युवक जखमी झाला आहे. हा विचित्र अपघात नाशिकजवळील पळसे येथे घडला. या अपघातात राजगुरूनगरहून येणारी बस खाक झाली. बसमधील प्रवासी सुखरूप आहेत. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
गुरूवारी सकाळी राजगुरुनगर आगारातून नाशिककडे ४३ प्रवासी घेऊन राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली. पळसेजवळ सिन्नर आगाराच्या बसमधून प्रवासी उतरत असताना राजगुरूनगरच्या बसची मागच्या बाजूने धडक बसली. सिन्नर आगाराची बस थांबून असल्याने तिच्यामागे थांबून असलेल्या दोन दुचाकीस्वारांनाही धडक बसल्याने दोघे दाबले गेले. धडकेनंतर राजगुरूनगरच्या बसने पेट घेतला. बस पेटल्याने परिसरातील नागरिकांनी प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढले. परंतु, दुचाकीवरील दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. क्षत्रिय नावाचा युवकही जखमी झाला, त्याला सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनच्या तीन बंबांनी बसला लागलेली आग विझवली.
मदतकार्य सुरू असतांना काही प्रवाशांना बसच्या काचा लागल्याने ते जखमी झाले. अपघातानंतर जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. गर्दीवर नियंत्रण मिळवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. मयत दुचाकीस्वारांची ओळख पटू शकली नाही. गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.