लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव येथे गुरुवारी दुपारनंतर शेती कसण्याच्या वादातून दोन कुटूंबांमध्ये वाद होऊन गावठी बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
मलगावजवळील पिपलीपाडा येथे दोन शेती कसण्याचा वाद आहे. या वादातूनच गावठी बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. गोळी लागून अविनाश खर्डे (३०) याचा जागीच मृत्यू झाला. सुखराम खर्डे (४०) यांचा नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बंदुकीसह या वादात तलवारीचा देखील वापर करण्यात आला. तीन जण गंभीर जखमी असून यातील एक जण गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रायसिंग खर्डे, गणेश खर्डे आणि सुनील पावरा हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस अधिक माहिती घेत आहेत.