लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : महापालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागात जन्म दाखल्यांवर तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी आढळून आल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ४३ जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयित वकिलांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
जळगाव शहर महापालिकेत फेब्रुवारी महिन्यात तहसीलदारांच्या स्वाक्षरीने ५० प्रकरणे जन्म दाखल्यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागात सादर करण्यात आली होती. मात्र, त्या प्रकरणांबाबत महपालिकने संशय व्यक्त केल्याने तहसील विभागाने सर्व दाखल्यांची पुन्हा पडताळणी केली. तेव्हा केवळ सात दाखल्यांवरच तहसीलदार राजपूत यांची स्वाक्षरी आढळून आली. उर्वरित ४३ दाखल्यांवर बनावट स्वाक्षरी व शिक्के असल्याने निष्पन्न झाले.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या संशयितांवर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील ३५ जणांची तपासणी केली. त्यानुसार, संशयित वकील शेख मोहम्मद रईस बागवान (रा. शाहूनगर, जळगाव), शेख मोहसीन शेख सादिक मणियार (रा. पिंप्राळा, जळगाव) यांनी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे दाखले अन्य संशयितांना उपलब्ध करून दिल्याचे तपासात आढळून आले, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
किरीट सोमय्यांकडून दखल
तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणाची भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेत मंगळवारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. असे प्रकार फक्त जळगाव शहरातच नव्हे तर, संपूर्ण राज्यात घडल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याशी सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत सविस्तर चर्चा केली.