नाशिक : जिल्ह्यात बिबट्याचा वावर आणि हल्ले सर्वत्र होत असल्याने वन विभागाचे काम चांगलेच वाढले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी पहाटे जाखोरी आणि शिंदे गावातून दोन बिबटे जाळ्यात अडकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या जिल्ह्यात द्राक्ष तोडणी, ऊस तोडणीच्या कामाने वेग घेतला आहे. उसाच्या शेतात बऱ्याचदा बिबट्या लपलेला असतो. तोडणीमुळे उसाचे शेत मोकळे होत असल्याने बिबट्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. सध्या जिल्हात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येत आहे. जाखोरी शिवारात डॉ. बबलू सय्यद यांची शेती आहे. त्यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना काही दिवसांपूर्वी तीन बिबटे दिसले होते. काही दिवसांपूर्वी त्यापैकी एक बिबट्या वन विभागाने जेरबंद केला. इतर दोन बिबट्यांच्या शोधात वनविभागाचे अधिकारी होते. बुधवारी पहाटे याच परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला.

हेही वाचा >>> ‘ओबान’ चित्ता पुन्हा पळाला, थेट वाघांच्या अधिवासात शिरला..

वन विभागाच्या ताब्यात असलेला बिबट्या दोन ते सव्वादोन वर्षाचा असून मादी आहे. तर शिंदे गावात महिन्यापूर्वी दोन बिबटे पकडण्यात आले होते. अजून एका बिबट्याला पकड्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. बबन जाधव यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे बिबट्या अडकला. हा बिबट्या साडेपाच वर्षाचा असून नर आहे. बिबट्यांचा वाढता वावर पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करुन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.