नांदगाव : वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनिदेव मंदिराजवळ ही घटना घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याने १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील व्यक्तीने यासंदर्भात नांदगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदगाव तालुक्यात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीचे तिच्या गावातील एकाशी प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध करत त्यांना वारंवार धमक्या दिल्याने मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मंगळवारी रात्री नऊ वाजता संबंधित महिलेने तिच्या भावाला व्हॉट्स ॲपवर संदेश पाठवला. त्यात तिने आत्महत्येस जबाबदार असलेल्या १६ जणांची नावे नमूद केली होती. महिलेचे नातेवाईक मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता तिथे त्यांना महिलेसह तिच्या प्रियकराने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.