लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: गंजमाळ परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन परप्रांतीय बाल कामगारांची सुटका करण्यात आली. कामगार उपायुक्त कार्यालयाने ही कारवाई केली.
या बाबत कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक विशाल जोगी यांनी तक्रार दिली. खडकाळी येथील त्र्यंबक पोलीस चौकी मागील गरीब नवाज हॉटेलमध्ये बाल कामगारांकडून कमी वेतनात अधिक श्रम करून घेतले जात असल्याची माहिती कामगार उपायुक्त कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार दुकान निरीक्षक जोगी आणि सु. च. लोहार यांच्या पथकाने कारवाई केली.
हेही वाचा… नाशिक: मारहाण करुन त्रिकूटाकडून ५० हजार लंपास
पथकाने बंदोबस्तात छापा टाकला असता १५ आणि १३ वयोगटातील दोन परप्रांतीय कामगार साफसफाई आणि नोकराचे काम करतांना मिळून आले. त्यातील एक चार महिन्यांपासून तर दुसरा गेल्या महिनाभरापासून या हॉटेलमध्ये कमी वेतनात काम करीत असल्याचे उघड झाले आहे. मुक्त केलेल्या बाल कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने उंटवाडी येथील बालगृहात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हॉटेल मालक नदिम तांबोळी (सरदार मंजील, खडकाळी) याच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.