नाशिक – भारतीय लष्करातर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल ब्रांचच्या ६४ व्या अधिकारी प्रशिक्षण तुकडीसाठीची अंतिम गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यात नाशिकच्या तेजस रायते आणि ओम चव्हाणके या दोघांनी स्थान मिळविले आहे.

तेजस आणि ओम हे दोघे विद्यार्थी ११ वीपासूनच एनडीए परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करत होते. परंतु, तेथे त्यांना यश आले नाही. १२ वीनंतरही दोघांनी जिद्दीने तयारी सुरु ठेवली. आणि शेवटी आपले ध्येय गाठले. तेजसने इलेक्ट्रिकल शाखेतून अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. त्याचे वडील सुधाकर रायते हे लष्करातील निवृत्त नायब सुभेदार असून आई अलका या गृहिणी आहेत. त्याने बॉक्सिंगमध्ये विशेष प्राविण्य मिळविले असून छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, बास्केटबॉल, फुटबॉलमध्येही त्याचा सहभाग राहिला. अंतिम गुणवत्ता यादीत त्याने नववा क्रमांक मिळवला.

ओम चव्हाणके स्थापत्य शाखेतून अभियांत्रिकी पदवीधारक आहे. त्याचे वडील संजय चव्हाणके हे थायसन कृप कंपनीत गुणवत्ता नियंत्रण अधिकारी असून आई सुवर्णा या गृहिणी आहेत. ओमला मोटरसायकल, कॅम्पिंग, गिर्यारोहण व पुस्तके वाचण्याची आवड आहे. अंतिम गुणवत्ता यादीत त्याने ४३ वा क्रमांक मिळवला. दोघांनीही सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखत पंजाबमधील जालंधर केंद्रातून उत्तीर्ण केली होती. हे दोघे एप्रिल महिन्यात ११ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गयास्थित अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत दाखल होतील. आणि प्रशिक्षण पूर्ण होताच भारतीय लष्करात लेफ्टनंट बनून कारकीर्द सुरु करतील. लष्करात अधिकारी होणाऱ्या तेजस आणि ओमचे यश हे नाशिकमधील तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायक ठरणार आहे. मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत एकत्र आल्यास यश हमखास मिळते, हे दोघांनी सिद्ध केल्याचे सुदर्शन अकॅडमीचे हर्षल आहेरराव यांनी म्हटले आहे.

Story img Loader