विद्युतीकरणाच्या कामाचे ५६ लाख, ३१ हजार ५९० रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी दोन लाखाची लाच स्विकारताना वीज कंपनीच्या वित्त व लेखा शाखेचे व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक यांना रंगेहात हात पकडण्यात आले. येथील वीज कंपनीच्या कार्यालयातच ही कारवाई झाली. अमर खोंडे हे वित्त व लेखा शाखेचे व्यवस्थापक असून मनोज पगार सहव्यवस्थापक आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या शासकीय विद्युत ठेकेदाराने २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विद्युतीकरण कामांचा ठेका घेतला होता.
हेही वाचा >>> नाशिक:इगतपुरीजवळील अपघातात चार जणांचा मृत्यू;मृत ठाणे जिल्ह्यातील रहिवासी
जिल्हा नियोजन निधी अंतर्गत प्राप्त झालेले काम संबंधित ठेकेदाराने वेळेच्या आत पूर्णही केले. दोंडाईचा, धुळे विभाग आणि धुळे ग्रामीण विभागात करण्यात आलेल्या कामाचे ५६ लाख, ३१ हजार, ५९० रुपयांचे देयक तयार करण्यात आले. या देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी खोंडे आणि पगार यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देण्यास संबंधित ठेकेदाराने असमर्थता दर्शविल्यावर तडजोडीअंती दोन लाख, ५० हजार रुपये देण्याचे नक्की झाले. दरम्यान, ठेकेदाराने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास सूचित केले. लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी तक्रारीची पडताळणी केली. लाच स्वरुपात पहिला हप्ता दोन लाख रुपये देण्याचे ठरले. याचवेळी सापळा रचण्यात आला. आणि दोन लाखाची लाच स्विकारतांना खोंडे आणि पगार दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.