नंदुरबार- जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात २४ तासांच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. गणेश बुधावल या गावात शेतात काम करणाऱ्या ४४ वर्षाच्या महिलेवर हल्ल्याची घटना चर्चेत असतानाच तळोदा तालुक्यातीलच सरदार नगर या गावात १० वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करुन तिला ठार केले. एकाच तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात २४ तासात शेतकरी महिला आणि १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने शेतकरी हादरले आहेत.
उन्हाचा कडाका वाढू लागताच ग्रामीण भागात बिबट्यांचा संचारही वाढू लागला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बिबटे शेतांमध्ये तसेच पाणी असणाऱ्या ठिकाणी येऊ लागले आहेत. पाळीव प्राण्यांसह मानवावरही त्यांचे हल्ले होऊ लागले आहेत. गणेश बुधावल या गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. ललिताबाई अशोक पाडवी (४५) असे या महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी गणेश बुधावल या गावाच्या शिवारात ललिताबाई आणि त्यांचे पती अशोक पाडवी हे उसाच्या शेतात पाणी भरत होते. सध्या उन्हामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे भाग पडत आहे. त्यांच्या ऊसाच्या शेताला लागून मक्याचेही शेत आहे.
उसाच्या शेतात गवत वाढल्याने निंदणी करण्याचे कामही ललिताबाई करत होत्या. ललिताबाई या मक्याच्या शेतालगत अवघ्या आठ ते दहा फुटाच्या अंतरावर होत्या. त्याचवेळी मक्याच्या शेतातून बाहेर येत बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. ललिताबाई यांचा आवाज ऐकून त्यांचे पती अशोक पाडवी यांनी आवाजाच्या दिशेने बघितले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेतात काम करत असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केल्यामुळे ललिताबाई यांना बिबट्याने मक्याच्या शेतात सोडून पळ काढला. ललिताबाई यांचा गळा बिबट्याने जबड्यात पकडला होता. त्यामुळे त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता. परिस्थिती गंभीर असल्याने ललिताबाई यांना तत्काळ गणेश बुधावल गावात आणले गेले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
ललिताबाई यांच्या मृत्युची घटना ताजी असतानाच तळोदा तालुक्यातील सरदार नगरात दुसरी घटना घडली. १० वर्षांची दीपमाला तडवी मैत्रिणीसमवेत मका आणण्यासाठी शेतात गेली होती. त्यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. वनविभागाने पंचनामा केला असून या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.