चांदवड तालुक्यात चांदवड-देवळा रस्त्याने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शनिवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. बसमधील १० प्रवासी जखमी झाले आहेत. चैत्रोत्सवानिमित्त मनमाड आगारातून निघालेली महामंडळाची बस सप्तश्रृंग गडावर सकाळी पोहचली. दर्शन घेतल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास प्रवाश्यांसह बस पुन्हा मनमाडच्या दिशेने निघाली.
हेही वाचा >>> जळगाव : तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना जाळ्यात
देवळा-चांदवड रस्त्यावर बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली. एका झाडावर आदळून ती पुन्हा दुसऱ्या झाडावर आदळली. या अपघातात वाहक सारिका लहरे आणि प्रवासी संगीता खैरनार यांचा मृत्यू झाला. इतर १० प्रवासी जखमी असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाता मुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्यास सुरूवात केली. वाहतूक सुरळीत करण्यात आली.