नाशिक : परिसरात आपला प्रभाव राखण्याच्या उद्देशाने टोळक्याने राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नाशिक शहर उपाध्यक्षासह त्याच्या भावाची धारदार शस्त्राने हल्ला चढवत हत्या केल्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. परंतु, रात्री बोधलेनगर भागातील आंबेडकर वाडी येथील दुहेरी हत्याकांडाने शांततेला गालबोट लागले. टोळक्याच्या हल्ल्यात राष्ट्रवादीचे नाशिक शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव (३२) आणि त्यांचा भाऊ प्रशांत जाधव (३०, दोघे आंबेडकरवाडी, नाशिकरोड) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे (सर्व आंबेडकरवाडी, नाशिकरोड) या पाच जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनोद पवार यांनी तक्रार दिली.
या तक्रारीनुसार बुधवारी रात्री नऊ वाजता आंबेडकर वाडीतील बनकर चौक येथे पवार यांच्यासह मित्रमंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी जमले होते. यावेळी उमेश आणि प्रशांत जाधव हे दोघे बंधूही उपस्थित होते. सव्वा नऊच्या सुमारास भ्रमणध्वनी आल्याने जेवण करण्यासाठी उमेश जाधव हे आपल्या घराकडे निघाले. त्यावेळी सार्वजनिक शौचालयाजवळ टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. हे लक्षात आल्यावर प्रशांत जाधव हे भावाला वाचविण्यासाठी धावले. टोळक्याने दोघांवर धारदार शस्त्र आणि सळईने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोणी आडवे आले तर, त्याला संपवून टाकू, अशी धमकी देत टोळके दोन दुचाकींवर पळून गेले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उमेश आणि प्रशांत जाधव या दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात मोठा जमाव जमला होता. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संशयित हे नाशिकरोडच्या आंबेडकर वाडीत स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी दादागिरी करून दहशत निर्माण करतात. उमेश व प्रशांत जाधव यांच्याशीही त्यांचे यापूर्वी वाद झाले होते. टोळक्याच्या मनात आपल्या भाच्यांबाबत राग होता, असे विनोद पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. पूर्ववैमनस्य व परिसरात वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने टोळक्याने हा हल्ला केल्याचा अंदाज तपास यंत्रणेकडून वर्तविण्यात आला आहे.