लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : शहरातील भद्रकाली परिसरात अवैधरित्या गोवंश जनावरांची मांस विक्री सुरु असताना ती थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात दोन जण जखमी असून संशयितांविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. या प्रकारानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जखमी दाखल असलेल्या जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

भद्रकालीतील महापालिकेच्या डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयाच्या मागील बाजूला गोवंश जनावरांचे मांस विकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर भद्रकाली पोलीस संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी पोहचले. दरम्यान, काही कार्यकर्तेही त्या ठिकाणी गेले. श्रीकांत क्षत्रिय (३८, रा. उत्तमनगर), नीलेश गांगुर्डे (२३, रा. पाटीलनगर) या कार्यकर्त्यांनी मांसविक्रीचा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. बकरी ईद सण मुस्लीम बांधवांनी उत्साहात साजरा करावा, गोवंशचा वापर करु नये, अशा पध्दतीने हल्ला होत असेल तर बजरंग दल, हिंदू संघटना आक्रमक होतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

आणखी वाचा-नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांकडून त्र्यंबकेश्वर देवस्थानला सूचना

दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. छापा कारवाई सुरूअसताना कार्यकर्तेही तेथे पोहचले. तेथील जमावाचा या लोकांमुळेच ही कारवाई होत असल्याचा गैरसमज होऊन त्यांनी गांगुर्डे आणि क्षत्रिय यांच्यावर हल्ला केला, असे पाटील यांनी सांगितले. संशयितांविरुध्द सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people injured in mob attack in bhadrakali mrj
Show comments