मनमाड येथे गुटखा आणि मालेगाव परिसरातून गुंगीच्या गोळ्यांचा सुमारे १० हजार ८० रुपयांचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला. या गोळ्यांचा वापर नशा येण्यासाठी केला जात असून मालेगाव शहरात ही गोळी कुत्ता गोळी म्हणून नशेबाजांमध्ये प्रसिध्द आहे.
हेही वाचा >>>नाशिक: अमृत भारत स्थानक योजनेत नगरसूल, येवल्याचा समावेश गरजेचा; छगन भुजबळ यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
मालेगांव शहरात गुंगीच्या गोळ्यांची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती कॅम्प पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी मालेगावातील न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या औषधी गोळ्यांची विक्री करणारे रईस शहा (३२, रा. सलामताबाद) याच्या दुकानावर छापा टाकत गुंगीकारक औषधाचा १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहा हा त्याचा फरार साथीदार मुज्जमील याच्यासह शहरात वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान नसतांना मानवी जीवनास अपायकारक गुंगीकारक औषधे विकतांना आढळला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून आझादनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>नाशिक: मालवाहतूक वाहन आगीत खाक
मालेगाव शहरातून जाणाऱ्या नामपूर रस्त्यावरील गोविंदनगर, चंदनपुरी रोड-पवारवाडी तसेच मनमाड शहरातील सुभाष रोड परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी प्रवीण नेरकर (रा. मालेगाव कॅम्प), खलील अहमद मोहम्मद इसाक (रा. पवारवाडी), जमीरखान उस्मानखान पठाण (रा. मनमाड) यांच्या ताब्यातून ७० हजार ६०० रुपयांचा गुटख्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला.