लोकसत्ता वार्ताहर
धुळे: शहरातील राजेंद्र सुरी नगरातील श्री पार्श्वनाथ भगवान आणि श्री नाकोडा भैरव मंदिरात झालेली चोरी चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडकीस आणली असून दोघा चोरांना अटक करण्यात आली आहे. दोघा चोरट्यांकडून सुमारे दोन लाख ८० हजार रुपयांचे चांदीचे मुकूट, सोन्याच्या पट्ट्या आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
मंदिरातील मूर्तीवरील चांदीचे मुकूट, सोन्याच्या पट्ट्या, दागिने असा लाखोंचा ऐवज चोरीस गेला होता. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. निरीक्षक धीरज महाजन यांना एक संशयित सूरत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक संदीप ठाकरे, हवालदार पंकज चव्हाण यांचा समावेश असलेल्या पथकाला सूरत येथे पाठवून आसिफ शहा फकीर (४०, रा.नुरानी मशिदीजवळ, धुळे) याला ताब्यात घेतले.
हेही वाचा… चंद्रपूर: तीन बालकामगारांची सुटका; मालकाविरुद्ध गुन्हा
त्याने त्याच्या साथीदाराचे नाव सांगताच पोलिसांनी इमरान शेख उर्फ इमरान बाचक्या (२३, रा.अंबिका नगर, धुळे) यालाही ताब्यात घेतले. यानंतर आसिफकडून एक लाख, ६० हजार रुपयांचे दोन चांदीचे मुकूट, इमरान शेख याच्याकडून एक लाख, २० हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन पट्ट्या, असा एकूण दोन लाख, ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.