नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात बुडालेल्या मुंबईच्या दोनपैकी एका पर्यटकाचा मृतदेह शोधण्यात सोमवारी बचाव पथकास यश आले. सिद्धेश गुरव (२३) असे मृताचे नाव आहे. तर मुफद्दल हरहरवाला (४८, अंधेरी) यांचा शोध अद्याप सुरू आहे. दरम्यान, धरणामध्ये तीन जण बुडाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची पावले पर्यटन स्थळांकडे वळत आहेत. उष्णतेच्या काहिलीपासून पासून दिलासा मिळावा म्हणून इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये अनेक जण पोहण्यासाठी येत आहेत. रविवारीही सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक वैतरणा धरण परिसरात आले होते.
हेही वाचा >>> शेतकऱ्यांची अगतिकता व्यापाऱ्यांच्या पथ्यावर
दरम्यान, वैतरणा धरणात तीन जण बुडाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. धरण परिसरातील झारवड शिवारात दोन जण, तर अजून एक जण वावीहर्ष शिवारात बुडाल्याचे सांगण्यात आले. घोटी पोलिसांनी वैतरणा येथील स्थानिकांसह रविवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. मात्र कोणीही हाती लागले नाही. सोमवारी पोलिसांनी बुडालेल्या व्यक्तींचा पुन्हा शोध सुरू केला. वावीहर्ष शिवारात वैतरणा धरणात बुडालेल्या सिद्धेशचा मृतदेह झारवड येथे सापडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन व अन्य यंत्रणा या शोधमोहिमेत सहभागी झाल्या आहेत