नीलेश पवार

प्लॅन इंडिया या सेवा संस्थेने दीड वर्षांपासून जिल्हा आरोग्य विभागाला दिलेल्या दोन दुचाकी रुग्णवाहिका (बाईक ॲम्ब्युलन्स) वापराविना पडून आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद मुख्यालयाच्या आवारात धुळीत पडलेल्या या लाखो रुपयांच्या रुग्णवाहिकांविषयी आरोग्य विभाग प्लॅन इंडियाकडे बोट दाखवित आहे.

हेही वाचा >>>जळगाव: गोद्रीतील महाकुंभ म्हणजे बंजारा समाजाच्या अस्मितेचा हुंकार – बाबूसिंग महाराज यांचे प्रतिपादन

नंदुरबारसारख्या दुर्गम, अतीदुर्गम आदिवासीबहुल भागात रस्तेच नसल्याने रुग्णांपर्यत पोहचण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे कसब पणास लागते. अनेक वेळा रस्त्यांअभावी रुग्णांना झोळीत म्हणजे बाम्बुलन्समध्ये टाकून आरोग्य केंद्रापर्यत घेवून जावे लागते. गरज ओळखत नीती आयोगाने दुचाकी रुग्णवाहिका खरेदीसाठी पैसा दिला होता. याबाबत मदतीसाठी आता सेवाभावी संस्थादेखील पुढे सरसावल्या आहेत. प्लॅन इंडिया या सेवाभावी संस्थेने देखील आरोग्य विभागास मदतीच्या उद्देशाने अशाच पद्धतीने दोन दुचाकी रुग्णवाहिका खरेदी करुन दिल्या. परंतु, दीड वर्षांपासून या दुचाकी रुग्णवाहिकांचा वापरच झालेला नाही. दिल्लीहून आलेल्या या दोन दुचाकी रुग्णवाहिकांची किंमत चार लाखाच्या घरात असल्याचे सांगितले जाते. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी यांनी या सेवाभावी संस्थांकडून दान मिळालेल्या दुचाकी रुग्णवाहिका असून त्यांची नोंदणी त्या संस्थांकडून अद्याप न झाल्याचे सांगितले. दुसरीकडे प्लॅन इंडियाच्या नंदुरबारमधील समन्वयकांनी याबाबत प्रक्रिया सुरु असून लवकरात लवकर त्या वापरात येतील, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>जळगाव: मविप्र वाद; हाणामारी, दगडफेक प्रकरणात संजय पाटील यांना अटक

मुळात या दोन्ही दुचाकी रुग्णवाहिकांच्या तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने परिवहन विभागाकडुन त्यांची नोंदणी झालेली नाही. याआधी एका ठेकेदाराने नीती आयोगाच्या पैश्यातून जिल्हा परिषदेसाठी खरेदी केलेल्या अशाच पद्धतीच्या दुचाकी रुग्णवाहिकांची नोंदणी करण्यास नंदुरबार परिवहन विभागाने असमर्थता दर्शविली होती. मानकातच बसत नसल्याने मग या दुचाकी रुग्णवाहिका अमरावतीच्या परिवहन विभागाकडून नोंदणी करण्यात आल्या होत्या. आता परिवहन विभाग काय करते आणि या दुचाकी रुग्णवाहिका लवकरात लवकर वापरासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही हालचाल होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.