जळगाव: शहरातील गणपतीनगर परिसरातील सातपुडा हाउसिंग सोसायटीमध्ये एकाच गल्लीत शुक्रवारी पहाटे माथेफिरूने इंधन टाकून दोन मोटारींसह दुचाकी पेटवून दिल्या. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीलन तलरेजा (वय ३०) हे गणपतीनगर भागात कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांचा ऑटोपार्टस विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माथेफिरूने कापडावर इंधन टाकून मोटारीला आग लावली. शेजारील रहिवाशांनी मोटारीला आग लागल्याची माहिती तलरेजा यांना दिली. त्यांनी तातडीने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : धुळे : टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटातर्फे आंदोलन

मात्र, तोपर्यंत आगीमध्ये मोटारीचे नुकसान झाले. तलरेजा यांनी आठ महिन्यांपूर्वीच ही मोटार विकत घेतली होती. तसेच त्यांच्या गल्लीत राहणारे श्रीचंद अडवाणी (वय ४७) यांचीही मोटार आणि इलेक्टिक दुचाकीही त्याच पद्धतीने इंधन टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला. शेजारील रहिवाशांनी तातडीने धाव घेत कूपनलिकेच्या सहाय्याने आग विझविण्यात यश आले. यासंदर्भात तलरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात रात्री वाहने पेटविण्याचे संतापजनक प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलीस गस्तीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

Story img Loader