नाशिक: शहर परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना शहर पोलिसांनी दोन चोरांना पकडण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून अंबड, इंदिरानगर व ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गुन्ह्यातील चार लाख रुपये किंमतीच्या नऊ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. अंबड पोलिसांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा >>> नाशिक : महाथकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वादन ; थकबाकी वसुलीचा श्रीगणेशा
सप्टेंबरमध्ये उत्तमनगर येथील ओमकार पेंढारकर (२०) यांची मोटारसायकल घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांबाबत पोलीस शिपाई योगेश शिरसाठ व येवले यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून सचिन हिरे (२६, मूळ दाभाडी, मालेगाव, सध्या रा. मोरवाडी गाव, सिडको) आणि प्रमोद बच्छाव (३५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख ९० हजार रुपये किंमतीच्या नऊ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. अंबड, इंदिरानगर व मालेगाव येथून वाहने चोरल्याची कबुली संशयितांनी दिली. दोन वाहनांबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या कारवाईने विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल दृष्टीपथास आली. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगिरथ देशमुख, निरीक्षक नंदन बगाडे व श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. दरम्यान, मागील दीड ते दोन वर्षांपासून शहर व ग्रामीण भागात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू आहे. अनेक गुन्ह्यांत संशयितांचा छडा लागत नाही. त्यामुळे वाहनधारकांमध्ये अस्वस्थता आहे. या स्थितीत वेगवेगळ्या भागातून चोरीला गेलेली काही वाहने हस्तगत करण्यात यंत्रणेला यश मिळाले.