जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात अंजाळे गावाजवळ तापी नदीत असलेल्या डोहात पाय घसरून पडल्याने दोन महिला आणि एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

अंजाळे गावात नदीपात्राजवळ घाणेकरनगर असून, तिथे बादल भिल यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता. या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी वैशाली सतीश भिल (२८) त्यांचा मुलगा नकुल भिल (पाच, दोन्ही रा.अंतुर्ली ता. अमळनेर) आणि सपना सोनवणे (२७, रा. पळाशी, ता. सोयगाव) हे आले होते. गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता ते अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात आंघोळ आणि धुणे धुण्यासाठी गेले होते.

नदीपात्रातील डोहात तिघे बुडाल्याची माहिती गावात मिळाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, हवालदार अर्शद गवळी, इस्तियाक सय्यद, अनिल पाटील, उमेश महाजन घटनास्थळी दाखल झाले तिघांचे मृतदेह नदीपात्रातून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह रात्री आठ वाजता त्यांच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले.