लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शहरात त्र्यंबक रस्त्यावरील धामणकर चौकात दुचाकी दुभाजकावर धडकल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अर्णव पाटील (२३, निखील पार्क, अंबड लिंकरोड, कामटवाडे) आणि करण जायभावे (२२, शिवाजीनगर,सातपूर) अशी मृत युवकांची नावे आहेत. पाटील आणि जायभावे हे दोघे मित्र मध्यरात्री दुचाकीने सातपूरकडून ठक्कर बाजार बस स्थानकाकडे येत असताना हा अपघात झाला.
वेद मंदिर परिसरात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने धाव घेतली. जखमी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत हवालदार बागूल यांनी दिलेल्या तक्रारीवरून मृत चालक अर्णव पाटील याच्याविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.