नाशिक : उद्योग विश्वाला भेडसावणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात कार्यरत औद्योगिक संघटनांच्या सहभागाने गुरुवारी (१७ ऑगस्ट) येथे होणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’ या उद्योग परिषदेत उद्योजक, विश्लेषक, सरकारचे प्रतिनिधी यांच्यात व्यापक चर्चा घडविण्यात येणार आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह उद्योजक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि नामांकित उद्योजक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मुख्य प्रायोजक आहेत.
नाशिकमध्ये ‘एमआयडीसी’ची १२ आणि सहकारी औद्योगिक वसाहतींची ११ ठिकाणे आहेत. यातील उद्योगांची संख्या हजारोंच्या घरात आहे. स्थानिक पातळीवर नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा), नाईस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, लघुउद्योग भारती, उद्योग व निर्यातदार आणि वाइन उत्पादक संघटना तसेच सहकारी औद्योगिक विकास वसाहतींचा नाशिक विभागीय औद्योगिक वसाहत संघ, मालेगावातील यंत्रमागधारक आणि येवल्यातील पैठणी उत्पादक आदी संघटना कार्यरत आहेत.
प्रलंबित प्रश्न आणि सामाईक मुद्दय़ांवर सर्व औद्योगिक संघटना ‘निमा’च्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे काम करतात. उद्योग जगतातून सामाजिक कामात पुढाकार घेतला जातो. ‘नाशिक फस्र्ट’सारखी उद्योजकांची संघटना रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक सुरक्षेवर अनेक वर्षांपासून काम करीत आहे. संस्थेने वाहतूक शिक्षण बागेची उभारणी (ट्रॅफिक एज्युकेशन पार्क) केली आहे. संस्थेने सुरक्षित वाहतुकीबाबत दोन लाखांहून अधिक वाहनचालकांना प्रशिक्षणही दिले आहे.
निमंत्रितांसाठीच..
’औद्योगिक संघटनांच्या सहभागातून ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह २०२३’ या उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
’लघु-मध्यम उद्योग क्षेत्रासमोरील आव्हाने, समस्या आणि उपाय यावर परिषदेत मंथन होईल. ही उद्योग परिषद केवळ निमंत्रितांसाठीच आहे.
मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ