नाशिक : अयोध्येतील आंदोलनातील योगदानावरून राजकीय पातळीवर कुरघोडी सुरू असताना ठाकरे गटाने येथील महाशिबिराचे औचित्य साधून ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ या प्रदर्शनाद्वारे शिवसैनिकांचा सहभाग अधोरेखीत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खा. संजय राऊत व सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हे प्रदर्शन संपूर्ण राज्यात नेले जाणार असून त्याची सुरुवात नागपूर येथून केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन करावे, असे आवाहन खा. राऊत यांनी केले.
शिवसेना ठाकरे गट महाशिबीर आणि जाहीर सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यव्यापी महाशिबीर त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रसी येथे होत आहे. त्यात राज्यभरातून सुमारे दोन हजार प्रतिनिधी सहभागी होतील. याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंकडून काळाराम मंदिरात पूजा; शिबिर, सभेच्या माध्यमातून नाशिकमध्ये आज शक्तिप्रदर्शन
महाशिबिराचे औचित्य साधून शिबीरस्थळी ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ या खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांची ही संकल्पना असल्याचे राऊत यांनी सांगितले. प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिकमध्ये होत असून त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन केले जाणार आहे. त्याची सुरुवात नागपूर येथून केली जाणार असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले. नागपूर येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रदर्शनात काय आहे ?
प्रदर्शनातील दालनात पडद्यावर साडेसहा मिनिटांची चित्रफित दाखविली जाते. अयोध्येतील आंदोलनातील बातम्या, छायाचित्र व लेखांचे छायाचित्र या ठिकाणी आहे. चित्रफितीत कार सेवकांचे अनुभव, मुलाखती सादर केल्या जातात. अयोध्येतील लढ्यात सहभागी झालेल्या शिवसैनिकांची माहिती देणारे हे प्रदर्शन आहे.