सातत्याने सरकारवर टीका करणारी शिवसेना आज भाजपसोबत कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र चार वर्षांत सरकारच्या चांगल्या कामात शिवसेनेने कधीही खोडा घातलेला नाही. चुकीचे काम आणि दोषांवर फटकारले आहे. चुकीच्या कामांना फटकारे मारणे ही ठाकरे घराण्याची परंपरा आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असून सरकारने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
शनिवारी आमदार अनिल कदम यांच्या निफाड मतदारसंघातील विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन पिंपळगाव बसवंत येथे ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपची मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती. भाजप नेत्यांनी सेनेविषयी आपुलकी दाखवत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीवर लक्ष दिल्याचे यावेळी पहावयास मिळाले.
या कार्यक्रमास उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकाच मोटारीतून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाषणात काय होणार, याची उत्सुकता होती. आपण सरकारवर टीका करत नाही तर शेतकरी, सामान्यांच्या हिताचे बोलत असतो, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. कर्जमाफी दिल्याचा सरकार दावा करते.
मात्र प्रत्यक्षात अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीसह दुष्काळाचा सरकारने फेरआढावा घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नदी जोड प्रकल्प प्रत्यक्षात येणार का, असा प्रश्न करत पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांचे जोडे खाण्यापेक्षा माणसे जोडा, असा सल्लाही त्यांनी दिला. टोमॅटो, इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी पाकिस्तान, बांग्लादेश यांच्या सीमा खुल्या व्हाव्यात यासाठी मंत्री, खासदार, आमदारांनी एकत्र यावे. शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली काढावा. राम मंदिराचे भूमिपूजन वेळेत व्हायला हवे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
महसूलमंत्री पाटील यांनी राज्यात ३२ हजार किलोमीटरचे दर्जेदार रस्ते तयार होत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३० हजार किलोमीटरचे रस्ते तयार होत आहेत. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी सर्वच मतदारसंघांत कामे सुरू असल्याचे ते म्हणाले. सेनेच्या मंत्री, आमदारांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची समजूत चुकीची असून विरोधकांकडून याबाबत अफवा पसरविल्या जात असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.
गंगापूर, पालखेडमधून पाणी नाही
राज्यावर दुष्काळाचे सावट, पाणीटंचाई संकट आहे. मराठवाडय़ात तीव्र पाणीटंचाई असून धरणांमध्ये अल्प जलसाठा आहे. मराठवाडय़ाला पाणी सोडले तर नाशिकचे जोडे खावे लागतात आणि नाही सोडले तर मराठवाडय़ाचे जोडे खावे लागतात. म्हणून शासनाने पाण्याबाबत समान धोरण आखले आहे. असे असले तरी गंगापूर, पालखेड धरण समूहातून मराठवाडय़ाला पाणी दिले जाणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.