नाशिक : अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील पंचवटीच्या काळाराम मंदिरात सहकुटुंब पूजा केली. त्यानंतर रामकुंडावर शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांनी गोदापूजन केले. मंगळवारी पक्षाचे राज्यस्तरीय महाशिबिर आणि जाहीर सभा होणार असून त्याद्वारे ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करणार आहे.
हेही वाचा >>> अयोध्येतच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरात आहे श्रीरामाची कृष्णवर्णीय मूर्ती; मोदींनीही घेतले आहे दर्शन
सोमवारी दुपारी ठाकरे यांचे शहरात आगमन झाले. यानिमित्त शिवसैनिकांनी प्रमुख चौक व रस्त्यांवर पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे फडकवून त्यांचे स्वागत केले. दौऱ्याच्या सुरुवातीलाच भगूर येथे सावरकर स्मारकास त्यांनी दिली. सायंकाळी पंचवटीतील काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते. यावेळी ठाकरे कुटुंबाने मंदिराची परिक्रमाही केली. त्यानंतर रामकुंड परिसरात ठाकरे यांनी गोदापूजन केले.
मंगळवारी त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रसी येथे ठाकरे गटाचे महाशिबीर होणार आहे. यात राज्यभरातून सुमारे दोन हजार प्रतिनिधी सहभागी होतील. अयोध्येतील लढयात सहभागी झालेल्या शिवसैनिकांची माहिती देणाऱ्या ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ प्रदर्शन’ हे प्रदर्शन शिबिर स्थळी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे यांची जाहीर सभा होईल. यावेळी शाहिरी, पोवाडे, अंबाबाईचा गोंधळ अशा सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> नाशिक : संरक्षक भिंतीच्या तारांमध्ये अडकलेल्या बिबट्याची मुक्तता
गर्दीमुळे नियोजनात व्यत्यय
रामकुंडावरील गोदा पूजनासाठी उभारलेले व्यासपीठ कमी क्षमतेचे होते. त्यावर पदाधिकाऱ्यांची गर्दी झाल्याने ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्याची वेळ आली. शिवसैनिकांचीही मोठी गर्दी होती. आरतीवेळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ठाकरे कुटुंबीय येण्यापूर्वीच महाआरतीची ज्योत प्रज्वलित करण्यात आल्यानेही गडबड उडाली. गोदा पूजन नियोजनात गर्दीमुळे व्यत्यय आल्याचे चित्र होते.