जळगाव : शिवसेना पक्ष फोडून तुम्ही विकत घेतलेल्या आमदारांच्या जीवावर सत्ता मिळवली. गद्दारांना ५० खोके दिले. परंतु, राज्यातील शेतकऱ्यांना काय मिळाले. आज कापसाचा भाव किती आहे, शेतकरी सुखी आहे का, असे प्रश्न शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. महाराष्ट्र सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असून तुम्हाला अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सोमवारी ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभेत त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केले. मुख्यमंत्री महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केले, असे म्हणतात. तुम्हीच आमचे कौतुक केलेला व्हिडिओ दाखवू का, असेही ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी येऊन जाऊन उद्धव ठाकरे यांनी हे करून दाखवावे ते करून दाखवावे, एवढेच बोलतात. रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्याविषयी कोणाला लाजलज्जा वाटली नाही. शिवाजी महाराजांचे मंदिर आम्ही बांधणार म्हटल्यावर देवेंद्र फडणवीसांची तळपायाची आग मस्तकात गेली. ते राज्याचे मुख्यमंत्री आमच्या टेकूमुळे झाले होते, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray questioned cotton prices and whether farmers happy with current situation sud 02