तुम्ही म्हणताय कांद्याला भाव मिळाला नाही, मी म्हणतो मिळाला. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली, किती खोक्याला एक कांदा गेला. एक कांदा ५० खोक्याला जात असेल, तर तुम्हाला किती खोके, रक्ताचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. याला उत्तर देत सुहास कांदेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“सभा पाहून उद्धव ठाकरेंची दया आली. पण, या सभेतून उत्तर महाराष्ट्राने काय घ्यायचं? एकीकडे राहुल गांधींना अपात्र ठरवलं म्हणून निषेध करायचा. दुसरीकडे सभेत राहुल गांधी सावरकरांबाबत चुकीचं बोलले हे सांगायचं. ही दुट्टपी भूमिका योग्य नाही. ही फक्त टोमणे सभा होती,” असा टोला सुहास कांदेंनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना लगावला.
हेही वाचा : “तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली, तरी…”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर बावनकुळेंचा पलटवार; म्हणाले…
“खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करण्यात यावी. मी काही कंत्राटदारांनी नावं सांगतो, त्यांनी उद्धव ठाकरेंना किती खोके दिले, याचीही नार्को टेस्ट करा. म्हणजे सर्वांना कळूद्या उद्धव ठाकरेंना खोके गेले की आम्हाला मिळाले. एकतरी रूपया घेतला असेल, तर राजीनामा नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल,” असं आव्हान सुहास कांदेंनी दिलं आहे.
हेही वाचा : “तुमचा नेता म्हणजे भारत नाही, एवढा क्षुद्र…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
“उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करणं बंद करावं. पाटणकरांची ईडी चौकशी बंद होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राज्याच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नाही. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर दोन दिवसांनी पाटणकरांची ईडी चौकशी बंद झाली. त्यामुळे पाटकरणांची ईडी चौकशी होऊद्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल,” असेही सुहास कांदेंनी सांगितलं.