देवळा तालुक्यातील सार्वजनिक, शासकीय जागेवरील १९ अनधिकृत धार्मिक स्थळे असून त्यावर जनहित याचिकेच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे.
या संदर्भात हरकती किंवा आक्षेप दाखल करायचे असतील तर देवळा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार कैलास पवार यांनी केले. देवळा तालुक्यातील सार्वजनिक तसेच शासकीय मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे धार्मिक स्थळे बांधण्यात आली आहेत. याविषयी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ही धार्मिक स्थळे स्थलांतरित किंवा निष्कासित करण्यासाठी तहसीलदारांना उच्च न्यायालयाने सूचना केली आहे. याबाबत तहसील कार्यालयाने तालुक्यातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली. त्यात महादेव मंदिर देवळा, मंजोबा पार, देवळा-नाशिक रस्त्यावरील पीरसा दर्गा, गुंजाळनगर येथील नवनाथ मंदिर व दत्त मंदिर, म्हसोबा मंदिर (निंबोळा ते उमराणे रस्ता), म्हसोबा मंदिर (भावडे देवळा नाशिक रस्ता), दत्त मंदिर वाखारी, कांचणे दुर्गा माता मंदिर, मेशी म्हसोबा मंदिर (मेशी-डोंगरगाव रस्ता), कुंभार्डे खंडेराव महाराज मंदिर, म्हसोबा मंदिर (कुंभार्डे ते उमराणे रस्ता), गिरणारे धनदाई देवी मंदिर (गिरणारे ते तिसगाव रस्ता), सोमेश्वर मंदिर (सिगांव रोड), हनुमान मंदिर (मनमाड रोड), पावजी दादा मंदिर (तिसांव ते गिरणारे रोड), उमराणे पावजी दादा मंदिर (देवळा ते सौंदाणे रस्त्यालगत), पीरबाबा दर्गा (भावडे रस्ता) या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. धार्मिक स्थळे नियमितीकरण किंवा निष्कासनाबाबत नागरिकांच्या हरकती असल्यास त्या तहसील कार्यालयात २ डिसेंबपर्यंत तालुकास्तरीय समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा