नाशिक – शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड होत असल्याची बाब महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारवाईतून उघड झाली आहे. गेल्या दीड महिन्यात अनधिकृतपणे वृक्षतोड प्रकरणी १७ गुन्हे दाखल करण्यात आले. अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांना २३ लाख ७१ हजारांचा दंड करण्यात आला आहे.
वृक्षतोडीबाबत वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. मनपाच्या सहा विभागांत उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवते. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे. एक फेबुवारीपासून आतापर्यंत एकूण १७ गुन्हे दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक सहा गुन्ह्यांची नोंद पश्चिम विभागात झाली आहे. संबंधितांकडून सहा लाख ६५ हजारांचा दंड आकारण्यात आला. पंचवटी विभागात सर्वात कमी एक गुन्ह्याची नोंद झाली असून पावणे दोन लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. मनपाच्या पथकाने रविवारी सातपूर विभागातील आनंदवल्ली शिवारात ४५ फूट उंचीचे गुलमोहराचे डेरेदार झाड तोडून लाकूड घेऊन जाणारे वाहन मोठ्या शिताफीने पकडले होते. त्यातील दोन टन वजनाचा लाकूडफाटा ताब्यात घेण्यात आला. उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष प्राधिकरण निरीक्षक किरण बोडके, आर. बी. सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.
हेही वाचा – नाशिक : निवृत्ती चावरे मृत्यूची चौकशी करावी ; एल्गार संघटनेची मागणी
दरम्यान, सोसायटी व भूखंडधारक अनेक वेळा कोणतीही परवानगी न घेता आपल्या परिसरातील वृक्षाची तोड करतात. परवानगीशिवाय वृक्षतोड करता येत नाही, हेच बहुतेकांना माहीत नसते. वेगवेगळ्या कारणांचे निमित्त करून ही वृक्षतोड केली जात असते. वृक्ष छाटणी अथवा वृक्ष तोडण्यासाठी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून रितसर परवानगी घेऊनच कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करून दंड आकारला जातो. शहरात तशी मोहीम राबवली जात असल्याचे मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी म्हटले आहे.
विभागनिहाय गुन्हे आणि दंड
नाशिक पश्चिम – सहा गुन्हे (सहा लाख, ६५ हजार रुपये दंड)
पंचवटी – एक ( एक लाख, ७५ हजार रुपये)
नवीन नाशिक – दोन (तीन लाख ३५ हजार रुपये)
नाशिक पूर्व – चार (दोन लाख ७१ हजार रुपये)
सातपूर – दोन (तीन लाख ४० हजार रुपये)
नाशिक रोड – दोन (पाच लाख ८५ हजार रुपये)