महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल
शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना दुसरीकडे साफसफाईची कामे होत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्वच्छतेसह इतर कामे करताना पालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची तक्रार करत आपल्या प्रभागात स्वच्छतेसाठी पश्चिम विभागाच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांना महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करावे लागले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने संपूर्ण शहरात प्रभागनिहाय स्वच्छतेची कामे करण्याबाबत सर्व विभागांचे एकत्रितपणे नियोजन करण्याचे आश्वासन दिले.
महापालिकेत सत्ताधारी ‘भाजप’चे पदाधिकारी प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर वारंवार टिकास्त्र सोडत असताना विरोधकांना कामे करवून घेण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. पश्चिम विभागाच्या सभापती डॉ. पाटील यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील स्वच्छतेसाठी गुरुवारी पालिका मुख्यालयात आरोग्यधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.
प्रभागातील रस्ते कित्येक दिवस झाडले जात नाहीत. मोठय़ा प्रभागात कार्यरत २० ते २२ सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कमी केले. प्रभागात १२ झोपडपट्टय़ा आहेत. रस्त्याच्या कडेला प्रचंड गवत वाढले असून ते कोणी काढायचे याबाबत उद्यान आणि आरोग्य विभागात सावळागोंधळ आहे. प्रभागात डुकरांचा मुक्त संचार आहे. मोकळे भूखंड कोणी कसे स्वच्छ करायचे, याबद्दल प्रशासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रशासन आपल्या प्रभागाची स्वच्छता कशा पद्धतीने करणार, याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करत पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह आंदोलन सुरू केले. त्याची माहिती समजल्यानंतर अतिरिक्त उपायुक्त किशोर बोर्डे, आर. एम. बहिरम, एच. डी. फडोळ यांनी धाव घेऊन पाटील यांच्याशी चर्चा केली.
स्वच्छतेच्या कामात उद्यान, बांधकाम, आरोग्य विभागात समन्वय नाही. प्रत्येकाकडून परस्परांवर जबाबदारी ढकलली जाते. वीज वाहिन्यांलगच्या फांद्या काढताना विद्युत विभागाची तशीच कार्यपद्धती असते. स्वच्छतेची कामे होत नसल्याने प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विभागीय अधिकाऱ्यांना काही विशिष्ट रकमेची कामे करण्याचे अधिकार दिले गेले. संबंधितांकडून अधिकार असूनही छोटी मोठी कामे केली जात नसल्याने त्यांना अधिकार देऊन काय साध्य झाले, असा प्रश्न पाटील यांनी केला.
स्वच्छतेच्या मुद्यावर महापौरांनी आधी प्रशासनाला फैलावर घेतले. स्वच्छता, बांधकाम, उद्यान विभागातील कर्मचारी समन्वयाने कामे करतील, याचे नियोजन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पाटील यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.