निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे मत

उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची प्रतिक्रिया उमटत असली तरी तातडीने लष्करी कारवाई करण्याविषयी लष्करी क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर येत आहे. उरीच्या हल्ल्यास दहशतवादी हल्ला न मानता तो पाकिस्तानी सैन्याने भारताविरुध्द पुकारलेल्या अघोषित युध्दाचा भाग आहे. अघोषित युध्दाला घोषित युध्द हा पर्याय ठरू शकत नाही. भारताने पाकिस्तानविरोधात अघोषित युध्दाचा मार्ग अवलंबावा, असे काही तज्ज्ञांना वाटते. काहींच्या म्हणण्यानुसार लष्करी कारवाईसाठी ही योग्य वेळ नाही. जम्मू-काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखण्याकडे ते लक्ष वेधतात.

उरी येथील लष्करी तळावरील हल्ल्याने काही महिन्यांपूर्वी पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती झाली. भारत प्रत्युत्तर देत नसल्याने पाकिस्तानने दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊन हल्ले करण्याचे सत्र कायम ठेवले आहे. उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या येथील संदीप सोमनाथ ठोक या जवानाचे मेव्हणे ज्ञानेश्वर चव्हाणके यांनी लष्करी तळावर हल्ला करणाऱ्यांचा खात्मा करण्याची गरज अधोरेखीत केली. जवानाने देशासाठी बलिदान दिले, असे आपण किती दिवस म्हणणार ? ज्या कुटुंबावर संकट कोसळते त्यांचे दु:ख मोठे असते. त्यामुळे सरकारने आता कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे चव्हाणके यांनी नमूद केले. भारताने पाकिस्तानवर त्वरेने लष्करी कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांसह राजकीय पातळीवरून केली जात आहे. परंतु, त्या संदर्भात लष्करी तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत.

शहीद जवानांच्या कुटुंबियांची भावना रास्त आहे. परंतु, पाकिस्तानच्या अघोषित अर्थात छुप्या युध्दाविरोधात घोषित युध्द (प्रत्यक्ष युध्द जाहीर करणे) करणे हा योग्य पर्याय नाही. उरी वा देशातील कोणत्याही हल्ल्यास दहशतवादी हल्ला म्हणणे म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानी सैन्याला मदत केल्यासारखे होईल. कारण, पाकिस्तानी सैन्य व आयएसआय संघटना दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते. शस्त्र व पैसा पुरविते. त्यांच्या आदेशावरून दहशतवादी भारतात हल्ले करतात. म्हणजे हे हल्ले पाकिस्तानी सैन्यच करत असल्याचे मत लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले. पाकिस्तानी सैन्याच्या रणनीतीला त्याच छुप्या पध्दतीच्या युध्दाने प्रत्युत्तर देता येईल. त्यासाठी भारतीय सैन्याला मोकळीक दिली जावी. पाकिस्तानी लष्करातील जे घटक दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतात, त्यांना त्यांच्याच भागात टिपण्यासाठी प्रत्यक्ष युध्द न करता अघोषित युध्दाचा मार्ग अवलंबणे  योग्य असल्याचे डॉ. शेकटकर यांनी नमूद केले.

कर्नल आनंद देशपांडे (निवृत्त) यांच्या मते लष्करी कारवाईसाठी ही योग्य वेळ नाही. उरीच्या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कर सज्जता राखून आहे. भारतीय लष्कर पाकिस्तानात कुठेही हल्ला करू शकते. परंतु, आपली खरी ताकद संयमात आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आजतागायत हे तत्व आपण पाळले आहे. संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्य सीमेवर धाडण्यात आले.  त्यातून काहीच साध्य झाले नाही. या पध्दतीने लष्कराची हालचाल खर्चिक बाब आहे. पुढील दोन-तीन महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून लष्कराला पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करता येईल, असा पर्याय देशपांडे यांनी सुचविला.