लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहर परिसरात वाहतूक विभागाच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वेगवेगळ्या मोहिमा, वाहतूक नियम अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत २२ दिवसांत १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे पालन नागरिकांनी करावे, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रयत्न होत आहेत. या अंतर्गत १३ जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधीत वाहतूक विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये चुकीच्या दिशेने वाहतूक करणारे १००८, सिग्नल तोडणारे एक हजार १९१, क्षमतेपेक्षा जास्त वजन घेणारी २३० वाहने, रिफ्लेक्टर न लावलेली १२० वाहने, रिफ्लेक्टर लावण्याचे काम एक हजार २११ वाहनांना, उड्डाणपुलावर बंदी असतांनाही प्रवास करणारी ४०४ दुचाकी यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली.

उड्डाणपुलावरुन जाण्यास बंदी असतानाही ६४ रिक्षाचालकांनी वाहन पुढे नेले. विनानंबर १७२ वाहने होती. तसेच इतर ४३४ कारवाया झाल्या. चार हजार ८३४ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना इ-चलान अंतर्गत रुपये १८,९०,००० दंड ठोठावण्यात आलाहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

Story img Loader