नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालयात नववर्षात आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी शासकीय अधिकारी व कर्मचारी विशिष्ट रंगाच्या पेहरावात दिसतील. तसेच संबंधितांना दररोज ओळखपत्र दिसेल अशा पद्धतीने गळ्यात टाकावे लागणार आहे. महिन्यातून एकदा म्हणजे पहिल्या सोमवारी त्यांनी खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने कार्यालयात ये-जा करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयास या संदर्भात सूचना केल्या आहेत. शासकीय कार्यालयात अनेक अधिकारी, कर्मचारी ओळखपत्राचा वापर करत नाहीत. एखाद्या नागरिकाने विचारणा केल्यावर ओळखपत्र दाखवत नाहीत. हे अयोग्य असल्याचे वाघ यांनी सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी नागरिक येतात. त्यांना शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख होण्यासाठी गणवेश आणि त्यांचे नाव, पदनाम ज्ञात होण्यासाठी ओळखपत्र ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणवेशाचे बंधन प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या सोमवारी असून ओळखपत्र मात्र दररोज सर्वांना दिसेल अशा पध्दतीने बाळगावे लागणार आहे.
हेही वाचा >>>टाकेहर्षची पाण्यासाठी वणवण, हंडा मोर्चाचा इशारा
प्रदूषण आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी एक जानेवारीपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
गणवेशाचे स्वरुप
नवीन वर्षात प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या सोमवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फिकट निळ्या रंगाचा सदरा आणि काळ्या रंगाची विजार तर, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फिकट पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचे ब्लाऊज अथवा पिवळ्या रंगाचे सलवार कमीज परिधान करावे, असे सूचित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील कार्यालयातील कर्मचारी आठवड्यात एक दिवस अशा पेहरावात दिसतील.