नाशिक : शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्यात येणाऱ्या आडकाठी दूर केल्या, उपग्रहाव्दारे छायाचित्र घेऊन नुकसानीची माहिती घेण्याची व्यवस्था केली, यासारख्या कृषिविषयक निर्णयांची माहिती देत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषी संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री चौहान यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांना पैसे न देता व्यापारी निघून जातात. अशा फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. नवनव्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषिविषयक यंत्र घेण्यासाठी अनुदान देण्यापेक्षा थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिल्यास हवे ते यंत्र ते घेऊ शकतील. अशा सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी तुम्ही तुमचे सहकारी घेऊन दिल्लीत या, असे आमंत्रण चौहान यांनी राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांना दिले. यावेळी मध्य प्रदेशात राबविण्यात आलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांमध्ये देव दिसतो. त्यांच्या भल्यासाठी जे करता येईल ते आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी, नाशिक येथील शेतकरी प्रयोगशील असून नाविन्याचा शोध घेतात, असे सांगितले. शेतकऱ्यांच्या पाठीवरील फवारणी यंत्राऐवजी आता ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारतर्फे ऑनलाईन पोर्टल तयार करून ते महसूल विभागाशी जोडून शेतकऱ्यांना मिळणारी अनुदानाची प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी खासदार भास्कर भगरे, खासदार डाॅ. शोभा बच्छाव, आ. हिरामण खोसकर, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मुक्त विद्यापीठाच्या आवारात बचत गट, कृषी उत्पादक गट, उमेद अभियानातील गट यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनाची तसेच रोपवाटिकेची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधतांना उत्पादनासाठी असणारा खर्च, येणारे उत्पन्न व नफा किंवा तोटा याची माहिती घेतली.
हेही वाचा…जळगाव : भुसावळमध्ये गॅस संच दुरुस्तीवेळी मोटारीचा पेट
केंद्रीय मंत्र्यांकडून लोकप्रतिनिधींचे कौतुक
कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्यासह भास्कर भगरे आणि डाॅ. शोभा बच्छाव हे दोन्ही खासदार, आमदार हिरामण खोसकर यांचा आपल्या विशेष शैलीत उल्लेख केला. कृषिमंत्री शेतकऱ्यांसाठी माणिक झाले. भास्कर तर सूर्याचे नाव, शोभाही आहे. आमदार तर हिरा आहेत, असे चौहान म्हणाले. माणिकराव तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी, आणि आपण दोघे शेतकऱ्यांसाठी, असे त्यांनी नमूद केले.